उष्माघातामुळे शेतमजुर तरूणाचा दुदैवी मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या उष्णतेची लहर मोठ्या प्रमाणात सुरू असून यात तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतमजूर तरूणाचा बळी गेल्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

यावल तालुक्यात उष्णतेचा हाहाकार सुरू असून यंदा तापमान प्रथमच ४६ अंश सेल्शियस गेल्याने लोक त्रस्त झाले आहेत. यातच दहिगाव तालुका यावल येथील तरुणाचा उष्णतेच्या लाटेने मृत्यू तालुक्यातील उष्माघाताची दुसरी घटना घडली आहे.

यावल तालुक्यातील दहिगाव येथील महाजन गल्लीतील शेतमजूर वैभव धर्मराज फिरके (वय २७ वर्ष ) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला. वैभव हा नुकताच शेतातून घरी परतला असता सायंकाळी पाच वाजेचे सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागले. त्याच्यावर खाजगी डॉक्टरांनी उपचार करीत असतांना तो मयत स्थितीत आढळून आला. वैभव फिरके यांचा मृत्यू वाढत्या तापमानाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उष्माघाताने बळी गेल्याची ही यावल तालुक्यातील दुसरी घटना आहे.

दरम्यान, मयत वैभव फिरके हा कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकर्‍यांकडून होत आहे.

Protected Content