मांजरीचे पिल्लू समजून त्या चिमुकल्यांनी खेळवले चक्क बिबट्याचे बछडे  

मालेगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या तालुक्यात ‘मोरदर’ येथे चिमुकल्यांनी मांजरीचे पिल्लू समजून चक्क बिबट्याचे बछड्याला एक दोन नव्हे तर पाच दिवस खेळवल्याचे वृत्त समोर आले आहे. याविषयीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहे.

‘बालपण हे निरागस असतं.’ याचा प्रत्यय यावा असा प्रसंग नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या तालुक्यात ‘मोरदर’ येथे ठाकरे कुटुंबात घडला आहे.  मादीपासून दुरावलेले अडीच महिन्याचे बिबट्याचे बछडे जंगलात सैरभैर फिरत असताना मानवी वसाहतीजवळ आलं. त्यावेळी कृष्णा ठाकरे यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांना हे बछडं दिसलं. या चिमुकल्यांनी मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याच्या बछड्याला घरी आणलं. त्याला दुध पाजून, खाऊ घालत त्याचं संगोपन व संरक्षण केलं. ५ दिवसानंतर मात्र हे बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात आलं..

कुटुंबाने वनविभागाला संपर्क साधून बिबट्याच्या बछड्याला त्यांच्या ताब्यात दिलं. मालेगाव वनविभागाने या बछड्यावर उपचार करून त्याला नाशिक वनविभागाकडे सुपुर्द केलं आहे. या पाच दिवसात चिमुकल्यांना या बछड्याचा लळा लागल्याने बछड्याला वनविभागाकडे दिल्याने ते गहिवरले होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!