


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहराच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या भूमिगत गटार (भुयारी गटार) योजनेस राज्य शासनाकडून अंतिम मान्यता मिळवून दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन यांचा वरणगावकरांच्या वतीने अत्यंत उत्साहात नागरी सत्कार करण्यात आला. वरणगाव शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या या योजनेच्या मंजुरीबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त करत तब्बल ११ किलो पेढे वाटून आणि जल्लोष करत मंत्री महाजन यांचे आभार मानले.
वरणगाव शहरात आधुनिक व भूमिगत गटार प्रकल्प व्हावा, याकरिता लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे हे गेल्या ८ महिन्यांपासून राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. शहराची वाढती लोकसंख्या आणि सांडपाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी भुयारी गटार योजना अत्यंत गरजेची होती. या पाठपुराव्याची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नांतून राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण (मुंरेएफ) योजनेअंतर्गत वरणगाव शहरासाठी या भुयारी गटार योजनेला अखेर मंजुरी दिली आहे.
या मंजुरीनंतर वरणगावकरांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांचा श्री रामाची शाल आणि गुलाबाच्या फुलांचा मोठा हार अर्पण करून हृदय सत्कार केला. यावेळी उपस्थित नागरिकांना व कार्यकर्त्यांना ११ किलो पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी वरणगाव शहराच्या विकासात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही दिली, तसेच या भूमिगत गटार प्रकल्पाचे काम अतिशय तातडीने आणि दर्जेदार दर्जाचे करून घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना व लोकप्रतिनिधींना दिले.
याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक नाना चौधरी, मिलिंद भैसे, शामराव धनगर, सुनील माळी, आकाश निमकर, अजमल खान, फझल शेख, राहुल देशमुख, डॉ. सादिक शेख, साबीर कुरेशी, भोजराज पालवे, हितेश चौधरी, योगेश माळी, रमेश पालवे, अनिल वंजारी, मयूर शेळके, कुंदन माळी, बळीराम दादा सोनवणे यांच्यासह वरणगाव शहरातील असंख्य नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



