जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुतण्याला सोबत जात असलेल्या दुचाकीस्वारांना दुचाकीस्वार महिलेने धडक दिली. यावेळी काका पुतणे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. दरम्यान, मागून आलेल्या बुलेट स्वारांनी त्यांना मदत करीत असतांना त्यांनी तरुणाचा मोबाईल चोरुन नेला. ही घटना मंगळवारी ३० एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता डाबी हॉस्पिटलजवळ घडली. याप्रकरणी बुधवारी १ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत महावीर इंदरचंद गोलेच्छा (वय-३६) हा तरुण वास्तव्यास आहे. मंगळवारी ३० एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ते रिंगरोडवरील हॉटेल सायलीकडून पुतण्या हर्ष जितेंद्र गोलेच्छा (वय-१७) याला घेवून स्टेडीअमकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन (एमए १९, बीव्ही ६८७०) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. यावेळी समोरुन मोपेड गाडीवर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत येणाऱ्या महिलेने गोलेच्छा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गोलेच्छा हे पुतण्यासह रस्त्यावर कोसळले. या अपघातात दोघांना दुखापत झाली. दरम्यान, मागून येत असलेल्या बुलेट स्वारांनी गोलेच्छा यांना मदत करण्यासाठी आले. परंतु त्यातील एकाने त्यांच्या पुतण्याचा मोबाईल चोरुन नेला. याप्रकरणी महावीर गोलेच्छा यांनी बुधवारी १ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार धडक देणाऱ्या दुचाकीस्वार महिलेसह मोबाईल चोरुन नेणाऱ्या दुचाकीस्वार दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.