लंडन, वृत्तसंस्था | ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने (Conservative Party) दणदणीत विजय मिळवला. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता हाऊस ऑफ कॉमन्सच्या एकूण ६५० जागांपैकी ६४२ जागांचे निकाल जाहीर झाले आणि बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वात हुजूर पक्षाने बहुमताचा ३२६ हा आकडाही पार केला. पुन्हा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ते विराजमान झाले. “आता एक नवा जनादेश मिळाला असून यामुळे ब्रिटनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा मार्ग सुकर होईल” असे विजयानंतर जॉन्सन म्हणाले. पण यासोबतच जॉन्सन यांच्या विजयानंतर ब्रिटनमधील मुस्लिम ब्रिटन सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
‘मेट्रो यूके’च्या वृत्तानुसार, नव्या जॉन्सन सरकारमुळे ब्रिटीश-मुस्लिम समाज भविष्याबाबत चिंतेत आहे. याच चिंतेमुळे तेथील मुस्लिमांनी ब्रिटन सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बोरिस जॉन्सन यांच्यावर ‘इस्लामोफोबिया’चा आरोप आधीपासून होत आलाय. ‘मुस्लिम बराका फूड अँड चॅरिटी’चे प्रमूख मंजूर अली यांनी आपल्या मुलांच्या भविष्याबाबत चिंता असल्याचे म्हटले आहे. मंजूर अली हे गेल्या १० वर्षांपासून मँचेस्टरमध्ये गरजूंना जेवण पुरवण्याचे काम करतात. “ब्रिटन माझे घर आहे. पण आता कुठे जायचे, हे मला माहित नाहीये. मात्र, सुरक्षेसाठी ब्रिटन सोडावे, या मुद्द्यावर कुटुंबियांचे एकमत आहे,” असे अली म्हणाले. उत्तर लंडनमधील आयटी सल्लागार ईडान हीदेखील मंजूर अली यांच्याप्रमाणेच विचार करतेय. “जॉन्सन यांच्या विजयानंतर मी प्रचंड घाबरली आहे. हल्ले वाढण्याची शक्यता असल्याने इतरत्र नोकरी शोधायला सुरूवात केली असून तुर्की किंवा पाकिस्तानमध्ये जाण्याचा विचार आहे. माझ्यावर यापूर्वीही हल्ला झाला होता. त्यावेळी लोकांनी तोंडावरील स्कार्फ फाडून मला सर्वांसमोर दहशतवादी म्हटले होते,” असे ईडान म्हणाली.
इस्लामोफोबिया, जॉन्सन आणि माफी
बोरिस जॉन्सन यांनी आधी केलेल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर इस्लामोफोबिया आणि वर्णभेदी असल्याचा आरोप होतो. त्यांनी २००५ मध्ये ‘स्पेक्टेटर’मध्ये एका लेखात जनतेला इस्लामची भीती वाटणे साहजिक असल्याचे म्हटले होते. याशिवाय गेल्या वर्षी टेलिग्राफमधील एका लेखात जॉन्सन यांनी मुस्लिम महिलांची लेटरबॉक्स आणि बँक दरोडेखोरांसोबत तुलना केली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. मात्र, त्यावर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे ते म्हणाले होते. तसेच, यावर्षी निवडणूक प्रचारादरम्यान हुजूर पक्षाच्या अनेक उमेदवारांनी मुस्लिमांना लक्ष्य करताना काही पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे इस्लामोफोबियाबाबत जॉन्सन यांनी माफीही मागितली होती.