मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडीतर्फे उध्दव ठाकरे हे १ डिसेंबर नव्हे तर २८ नोव्हेंबर रोजीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज सायंकाळी महाआघाडीतर्फे उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा झाली. यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास महाआघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेले. याप्रसंगी एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांची उपस्थिती होती. या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा सादर केला. यानंतर आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली.
याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ हे २८ नोव्हेंबर रोजी घेणार आहेत. सर्व आमदार आता मुंबईत असून त्यांच्या सुविधेसाठी १ डिसेंबरच्या ऐवजी २८ तारखेलाच शपथविधी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदासाठी आपले नाव असले तरी याबाबत अद्याप सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच अन्य मंत्र्यांबाबत माहिती देणेही त्यांनी टाळले.