भाजपा पुरती नागडी झाली- सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल

jalgaon Shivsena

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात आले वस्त्रहरण थांबवले असले तरी भाजप मात्र पुरती नागडी झाली असल्याचा टोला मारत महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला असून आता शुभ घडेल असा आशावाद आज शिवसेनेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

काला सायंकाळीच उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड झाल्यानंतर बुधवारच्या सामनातून भाजपचा जोरदार समाचार घेण्यात येईल असे मानले जात होते. आणि झालेही असेच. मस्तवाल हैदोस थांबला आता शुभ घडेल या शीर्षकाखाली असणार्‍या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, बहुमताचा साधा आकडा नसतानाही फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, हा पहिला गुन्हा व ज्यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली त्या अजित पवारांवरील भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे चार तासांत मागे घेतले, हा दुसरा गुन्हा. या गुह्यांसाठी जागा निवडली मुंबईच्या राजभवनाची. जेथे संविधानाचे रक्षण व्हावे त्या संविधानाच्या संरक्षकांनीच या गुह्यांस कवच दिले. त्यामुळे आज ज्यांनी संविधान दिवस साजरा करण्याचे ढोंग केले त्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने चपराक मारली आहे. बहुमत चाचणी गुप्त मतदानाने नको, तर त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे ई.डी., इन्कम टॅक्स वगैरे भाजपचे कार्यकर्ते काय करणार? असा खडा सवाल यात करण्यात आला आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी इतके अगतिक का व्हावे? इतके अनैतिक व तत्त्वशून्य वागण्याची वेळ त्यांच्यावर यावी हे दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या आजच्या वारसदारांचे दुर्दैव! आम्ही १६२ चा आकडा दाखवूनही तो खोटा ठरवण्याचा घृणास्पद प्रयत्न त्यांनी केला. आता बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीसांचे सरकार पळून गेले. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची व राजकीय पक्षाची झाली नव्हती. अजित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात आपले वस्त्रहरण थांबवले, पण भाजपा पुरती नागडी झाली. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता सर्व शुभ घडेल असा आशवाद यात व्यक्त करण्यात आला आहे.

Protected Content