मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीतील पहिला भाग आज प्रसिध्द झाला असून यात त्यांनी बंडखोरांवर घणाघाती टीका केली आहे.
खासदार संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांची दोन भागांमध्ये मुलाखत घेणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले असल्याने याबाबत उत्सुकता लागून होती. आज या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिध्द करण्यात आला. यात त्यांनी अनेक विषयांना स्पर्श करतांनाच आपल्याला सोडून गेलेल्यांवर टीका केली आहे. यात आपण मरणाच्या दारात असतांना पक्षातीलच काही गद्दार हे सत्ता उलथून लावण्याचा प्रयत्न करत होते असे गंभीर आरोप केला आहे.
तुम्ही रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना तुमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता, असं म्हणत संजय राऊत यांनी पक्षातील बंडखोरांबाबत विचारणा केली. ठाकरे म्हणाले, तो फार वाईट अनुभव होता. मला तेव्हा श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. मानेत एक रक्ताची गुठळी तयार झाली होती. सुदैवाने डॉक्टर जागेवर होते. त्यामुळे ‘गोल्डन आवर’मध्ये ती शस्त्रक्रिया झाली. म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे. त्यावेळी काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवासमोर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं बोललं जात होतं.
ठाकरे पुढे म्हणाले की, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन. मी त्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, मी रुग्णालयात असताना त्यांनी विश्वासघात केला, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला.आम्ही हिंदुत्व सोडलं अशी बोंब जे मारत आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचं आहे की २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं? सध्या जे काही घडतेय यातून चांगलेच होणार असल्याचा आशावाद उध्दव ठाकरे यांनी या मुलाखतीत व्यक्त केला आहे.