मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूरातील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चार वर्षीय मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केला या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. परंतु हायकोर्टाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र, राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दादर येथील शिवसेना भवनजवळ आंदोलन केले. त्यावेळी सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान मुसळधार पावसानेही हजेरी लावली. यावेळी अनेक कार्यकर्ते धो – धो पावसात भिजत घोषणाबाजी करत होते.
डोक्याला काळ्या फिती बांधून आणि हाती काळे झेंडे घेऊन धो – धो पावसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेनेचे माजी महापौर, आमदार, खासदार, नेते व कार्यकर्ते हे आंदोलनात सहभागी झाले होते. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनचा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.