उध्दव ठाकरे यांचे जळगावात आगमन : तीन कार्यक्रमांना उपस्थिती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उबाठा पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचे जळगावात आगमन झाले आहे.

शिवसेना-उबाठा पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे आज जळगावात एक दिवसाच्या दौर्‍यासाठी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महापालिकेतील लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल व पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे लोकार्पण होणार आहे. यानंतर ते मानराज पार्क जवळच्या भव्य मैदानावर सभा घेणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून गेल्या अनेक दिवसांपासून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पुढाकाराने पिंप्राळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला असून एप्रिल महिन्यात याचे भूमीपुजन हे उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले होते. याचप्रसंगी त्यांनी आपण या पुतळ्याच्या अनावरणाला देखील येणार असल्याची ग्वाही दिली होती. हा शब्द पाळत ते आज जळगावात आले आहेत. यामुळे आज ते वचनपूर्ती सभेत नेमके काय बोलणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर, या सभेसाठी कुलभूषण पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अतिशय जय्यत तयारी केली असून उध्दव ठाकरे यांच्या या सभेला विक्रमी उपस्थिती लाभणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान, या सभेला उध्दव ठाकरे हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून त्यांच्यासोबत याप्रसंगी खासदार संजय राऊत, राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, समाधान महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, पाचोरा येथील वैशालीताई सूर्यवंशी, महानंदाताई पाटील, गायत्री सोनवणे, गजानन मालपुरे, माजी महापौर नितीन लढ्ढा, प्रशांत सुरळकर, विराज कावडिया आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Protected Content