युतीबाबत उद्धव ठाकरे द्विधामनस्थितीत

123

 

मुंबई वृत्त्‌संस्था । विधानसभेला निम्म्या निम्म्या जागा वाटून घेण्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात कमी जागा घेत भाजपसोबत युती करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शिवसेना नेतृत्व अडकल्याचे कळते.

याबाबत अधिक माहिती अशी की, निम्म्या जागांच्या प्रस्तावानुसार शिवसेनेच्या वाट्याला १४४ जागा येणार होत्या. त्यातील नऊ जागा शिवसेनेने मित्रपक्षांना सोडाव्यात असा सुरुवातीला भाजपचा आग्रह होता. मात्र मित्रपक्षांची साथ भाजपला असल्याने आपण कशाला जागा सोडायच्या अशी भूमिका शिवसेना नेतृत्वाने घेतली होती. मात्र नंतर त्यांनी १४४ मधील ९ जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे आता शिवेनेच्या वाट्याला १३५ जागा याव्यात असे शिवसेना नेतृत्वाचे म्हणणे होते. मात्र भाजपकडून या जागांसाठी अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. उलटपक्षी शिवसेनेला जवळपास १२० जागा देण्याची तयारी असल्याचे प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेला पाठविले जात आहेत. दिल्ली आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधल्यानंतरही १२० जागांच्या पुढे घोडे सरकत नसल्याने कमी जागा घेत युती कायम ठेवायची की सरळ युती तोडून २८८ जागा लढवायच्या, अशा द्विधा मनस्थितीत शिवसेना नेतृत्व असल्याचे कळते. एकीकडे जागा वाढवून घेण्याबाबत भाजपच्या नेत्यांशी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र थेट शिवसेनेच्या आमदारांशी, नेत्यांशी आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलूनच निर्णय घेण्याबाबत शिवसेना नेतृत्व गांभिर्याने विचार करीत असल्याचे कळते. याबाबत दोन दिवसांत शिवसेना भवनवर बैठकही आयोजित करण्यात येईल, असे सांगण्यात येते.

Protected Content