धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते.
अशावेळी या कुटूंबांच्या ‘उभारी’ साठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा कुटुंबांच्या पाठिशी शासन व प्रशासन खंबीरपणे पाठीशी आहे. अशा शब्दांमध्ये आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.
ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील ७ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात पावसामुळे घराची पडझड झालेल्या दोघांना शासकीय अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले. तर, ना. गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून तहसील कार्यालयात संगणक व प्रिंटर्ससह तलाठ्यांसाठी खुर्च्यांचे लोकार्पण देखील करण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय मदतीने वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी केले. यानंतर मृत्यूला कवटाळलेल्या ७ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये असे धनादेश वाटप करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पात्र वारसांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
याच कार्यक्रमात पावसामुळे घरांची पडझड झालेल्या रेल येथील छोटू दिलीप भील आणि हितेश रवींद्र पाटील यांना आर्थिक सहकार्य व धान्य किट वाटप करण्यात आले. तसेच आमदार निधीतून तहसील कार्यालयासाठी ६ संगणक आणि ६ प्रिंटर ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यासोबत कार्यालयीन खर्चातून १५ खुर्च्या वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख गजानन पाटील, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, मोतीआप्पा पाटील, सरपंच भगवान महाजन, पं. स. माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, न. पा. गटनेते पप्पू भावे, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, रवींद्र चव्हाण सर, भानुदास महाजन, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, सी. बी. देवराज, महसूल सहायक पंकज शिंदे, रविंद्र कंखरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी विरेंद्र सोनकांबळे यांनी केले. तर आभार नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी मानले.