Home Uncategorized शेंदुर्णीत ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा; बजरंग दल-विश्व हिंदू परिषदेची भव्य रॅली चर्चेत

शेंदुर्णीत ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा; बजरंग दल-विश्व हिंदू परिषदेची भव्य रॅली चर्चेत

0
119


शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शेंदुर्णी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. पारंपरिक व सांस्कृतिक वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत शहरातील विविध मंडळांनी सहभाग घेत शिवभक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला.

या भव्य मिरवणुकीत शेंदुर्णी शहरातील नऊ प्रखंडांमधील तब्बल ३५ मंडळांनी सहभाग घेतला. प्रत्येक मंडळाने पारंपरिक वेशभूषा, जिवंत ऐतिहासिक देखावे आणि सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग साकारले. या देखाव्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि संपूर्ण शहर शिवमय झाले होते.

मिरवणुकीची सुरुवात सोयगाव येथील पाण्याच्या टाकीजवळून करण्यात आली, तर समारोप पहूर रोडवरील शिव सृष्टी येथे झाला. मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत केले. या दरम्यान पारंपरिक इतिहासकालीन मैदानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी यांसारख्या युद्धकलेचे सादरीकरण करून युवकांनी शिवकालीन शौर्याची आठवण करून दिली.

याशिवाय समाजप्रबोधनात्मक संदेश देणारी पथनाट्ये सादर करण्यात आली. या पथनाट्यांमधून सामाजिक एकता, राष्ट्रप्रेम आणि शिवचरित्रातील आदर्श विचार नागरिकांसमोर मांडण्यात आले. या शिवजन्मोत्सव मिरवणुकीचे नियोजन मागील एक महिन्यापासून करण्यात आले होते. सहभागी मंडळांनी सातत्याने सराव करून या सोहळ्याची भव्यता वाढवली.

 


Protected Content

Play sound