‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती हवी का ? : मनसेचा राऊतांना इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना आणि मनसेतील वाद तीव्र झाले असतांनाच आता मनसैनिकांनी खासदार संजय राऊत यांना इशारा देतांना एका घटनेची आठवण करून दिली आहे. यासाठी थेट सामनाच्या कार्यालयासमोरच फलक लावण्यात आला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ”राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवैसी आहेत”, असं विधान केलं होतं. ठाकरे म्हणजे भाजपचा भोंगा असल्याचं ते म्हणाले. याला मनसेने आज सामना कार्यालयाच्या समोरच मोठा फलक लाऊन प्रत्युत्तर दिले आहे. ओवैसी कोणाला बोलता संजय राऊत? तुमचा कर्कश भोंगा बंद करा. तुम्ही मशीदीमधील मौलाना आहात का? असा प्रतिप्रश्न मनसेने उपस्थित केलाय. यासोबतच मनसेकडून राऊतांच्या पल्टी झालेल्या गाडीचा फोटो टाकण्यात आला आहे.

संजय राऊत मनसेच्या स्थापनेआधी राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी ’कृष्णकुंज’वर आले होते. यावेळी आक्रमक मनसैनिकांनी संजय राऊत यांच्याविरोधात घोषणा दिल्या. आणि काही वेळाने त्यांची गाडी पल्टी करण्यात आली होती. हा फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असा इशारा ही मनसैनिकांनी यातून दिला आहे. याला आता शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content