फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा बनाव करणार्या रोझोदा येथील दोघा तरुणांचा तपास लागला आहे. पोलीस तपासात या तरुणांनी केवळ केळी कामाला कंटाळून गावातून पलायन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील रोझोदा येथील जीवन प्रकाश मेढे (२९) व सागर सुभाष पाटील या दोन तरुणांनी रोझोदा शिवारातील एका विहिरीच्या बाहेर आपले मोबाइल व चपला ठेवून आत्महत्येचा बनाव २० जुलै रोजी घराबाहेर पडून केला होता. ग्रामस्थांनी या तरुणांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगताच पोलिसांनी विहिरीत दोन दिवस या तरुणांचा तपास केला. त्या ठिकाणी न सापडल्याने परिसरातील विहिरीसुद्धा पोलिसांनी पिंजून काढल्या होत्या. मात्र यात तरुणांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी शेवटी हात टेकत विहिरीमध्ये शोध थांबविला होता. मात्र त्यांनी गुप्त पद्धतीने तपास सुरू ठेवलेला होता. त्यातच ३० जुलै रोजी जीवन मेढे हा तरूण यावल येथे असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी तेथून त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याचा मित्र सागर सुभाष पाटील हा सुरत येथे असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ सुरत येथे संपर्क साधून त्याच्या नातेवाईकांना सर्व घटनेची कल्पना दिली व त्याला कुठे जाऊ देऊ नका, अशा सूचना केल्या. त्यानुसार पोलीस व पोलीस पाटील वासुदेव हिवरे हे सुरत येथे सागर पाटील याला ताब्यात घेण्यासाठी निघाले आहेत.
दरम्यान, या तरुणांनी असे का करावे करावे याची माहिती पोलिसांनी घेतली असता केवळ केळी कामाला कंटाळून त्या तरुणांनी हे पाऊल उचलले होते, असे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. या घटनेचा तपास सपोनि राहुल वाघ फौजदार पवार व हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.