जळगावात दुचाकी चोरटा अटकेत

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील काशिनाथ चौकातील एका हॉटेलात जेवणासाठी गेलेल्या तरूणाची बाहेर उभी असलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली असून याप्रकरणी एमआयडीसी स्थानकात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिसांनी चोरास ताब्यात घेतले आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अजय शालीक ब्राम्हणे (वय २७, रा. कौतीकनगर) हे १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांची हॉटलेच्या बाहेर दुचाकी (एमएच १९ बी ५५८६) उभी केली होती. ब्राम्हणे हे जेवण करुन बाहेर आले. तेव्हा त्यांची दुचाकी लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बराच वेळ शोध घेतला परंतू, दुचाकी मिळुन आली नाही. या प्रकरणी ब्राम्हणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्ह्याची दिली कबुली

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात संतोष रघुनाथ चौधरी (वय २७, रा. हतनुर, ता. भुसावळ) याला अटक केली. संतोष याने गुन्ह्याची कबुली दिली. परंतू, त्याच्याकडे ब्राम्हणे यांच्या दुचाकी ऐवजी (एमएच १९ एडब्ल्यू ६६००) क्रमांकाची दुसरी दुचाकी मिळुन आली आहे. ही दुचाकी देखील त्याने चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, संतोष याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात अवैध मद्यविक्री, चोरी, विनयभंग या सारखे एकुण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपार देखील करण्यात आले आहे.

या पथकाने केली अटक 

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलींद सोनवणे, हेमंत कळसकर, विजय बावस्कर, चंद्राकांत पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, होमगार्ड विजय कोळी व प्रशांत पाटील यांच्या पथकाने संतोष याला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता २३ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी काम पाहिले.

 

Protected Content