पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यात रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हिवरा नदीला अचानक पूर आल्याने पाचोऱ्याचा दुतर्फा संपर्क तुटला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या संदर्भात अधिक असे की, हिवरा नदीला पुर आल्यामुळे पाचोरा शहरात प्रवेश करणाऱ्या दोन्ही पुलांवर पाणी साचले आहे. यामुळे दुतर्फा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहतुकीचा खोळंबा निर्माण झालेला आहे. दरम्यान, पाचोरा-जळगाव मुख्य रस्त्यावर असलेला पूल रस्त्याच्या कामामुळे पाडण्यात आला आहे. त्याला पर्यायी दुतर्फा जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे पर्याय निर्माण केलेला पूल वाहून गेला आहे. दुसरीकडे कृष्णापुरी भागामध्ये असणाऱ्या पुलावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तिकडची वाहतूक ही बंद पडली आहे. त्यामुळे आता वाहतुकीसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.
हिवरा नदीला अचानक पूर आला आल्यामुळे कृष्णापुरी, त्रंबक नगर आदी भागातील नागरिकांनी व नदीकाठच्या सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूलने नदी पलीकडील पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शाळेतून लवकर घरी घेऊन जाण्याचे कळवले आहे.