जळगाव प्रतिनिधी । आज लागलेल्या युपीएससी नागरी सेवेच्या परिक्षेत येथील दर्जी फाऊंडेशनच्या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
आज केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यु.पी.एस.सी. सिव्हील सर्व्हिस परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहिर झालेला आहे. याची मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० पर्यंत घेण्यात आलेल्या होत्या. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे आय.ए.एस., आय.एफ.एस., आय.पी.एस. व केंद्रीय सेवा गृप – अ व गृप – इ साठी शिफरस करण्यात आलेली आहे. या निकालात भारतातून एकूण ८२९ विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. त्यात जळगाव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य दर्जी फाऊंडेशन परीवारातील दोन विद्यार्थी सदस्यांची यु.पी.एस.सी. परीक्षेत यशस्वी निवड झालेली आहे.
यातील अभिजित विश्वनाथ सरकाते हा मुळचा शेगाव (जि. बुलढाणा) येथील असून त्याला ऑल इंडिया रॅक ७१० मिळाली आहे. तर संग्राम सतीश शिंदे हा मुळचा (अंबक ता. कडेगाव जि. सांगली) येथील असून त्याला ऑल इंडिया रॅक ७८५ मिळाली आहे. या निकालाविषयी प्रा.गोपाल दर्जी यांनी असे सांगितले की, कोणतीही परीक्षा कठिण किंवा सोपी नसते. तिला समजून व योग्य मार्गदर्शन घेवून अभ्यास केला तर विद्यार्थी जीवनात कोणतीच परीक्षा अडचणीची नसते. १० वी व १२ वी नंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. तर शिक्षणासोबत एक चांगले करिअर आपल्याला मिळू शकते. अभिजित व संग्राम यांच्या युपीएससी परीक्षेत निवड झाल्यामुळे दर्जी फाऊंडेशन परीवारामध्ये आज आनंदाचा दिवस आहे. अधिक विद्यार्थ्यांना मदत व यशस्वी करण्याचे मनोबल वाढलेले आम्हाला दिसते. २०१९-२० वर्षामध्ये एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांद्वारे १३१ पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी होवून क्लास-१, क्लास-२ अधिकारी झाले याचा मला आनंद आहे. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रा.गोपाल दर्जी, दर्जी फाऊंंडेशनच्या संचालिका सौ.ज्योती दर्जी, श्रीराम पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.