तलावात बुडून दोन भावंडांचा मृत्यू : परिसर हळहळला !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सालबर्डी येथील रहिवासी असलेले दोन भाऊ शिवारातील उत्खननामुळे निर्मित झालेल्या तलावात पाय घसरून पडल्याने बुडून मरण पावल्याची दुर्घटना आज घडली असून यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

        या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सालबर्डी येथे कृष्णा ढाके हे आपली पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. आज दुपारी त्यांची दोन मुले वेदांत कृष्णा ढाके (वय 15) आणि चिराग कृष्णा ढाके (वय 10) हे आज सालबर्डी शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. यातील चिराग हा शिवारातील तलाव परिसरात बकऱ्या चारत असतांना त्यांचा पाय घसरून पडला, त्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी वेदांत याने देखील पाण्याची उडी मारली. दुर्दैवाने दोन्ही भाऊ तलावात बुडले.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सालबड शिवारात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे तलाव निर्मित झाला असून याच तलावाने दोन अजाण बालकांचा बळी घेतला आहे.

सालबर्डी येथील ढाके कुटुंब हे गरीब असून वडील रिक्षा चालवून तर आई शेतमजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. आज तलावात दोन्ही मुले बुडून मयत झाल्याने या कुटुंबावर वज्राघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content