मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेसाठी मतदान करता यावे यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री मलिक यांचा एक दिवसाच्या जामिनासाठी तातडीची सुनावणी न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मते त्यांच्या हातातून निसटली आहेत.
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण ढवळून निघालेले आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री मलिक यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर पोलीस संरक्षणात मतदानासाठी जाण्याची परवानगी मागणारी याचिका देखील केली होती. मात्र, त्यावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोघांच्या मतदानाची शक्यता संपली असून महाविकास आघाडीची हक्काची दोन मते रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सत्र न्यायालयाने एकदा मतदान करण्यास नकार दिलेला असताना पोलीस बंदोबस्तात मतदानासाठी नेण्याचा प्रश्न येतो कुठे ? असा प्रश्न उपस्थित करीत उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने नवाब मलिक यांच्या मतदानाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे देशमुख- मलिक यांच्या मतदानाची शक्यता संपली आहे.