यशवंत जाधवांच्या डायरीत अजून दोन नावे ! : मातोश्रीनंतर आता कुणाचा उल्लेख ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीचे उल्लेख आढळल्याने आरोप-प्रत्यारोप झाले असतांना याच डायरीतील अजून दोन नावांची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तीकर खात्याच्या पथकाने टाकलेल्या छाप्यानंतर एक डायरी जप्त करण्यात आली होती. याच डायरीशी संबंधीत एक गौप्यस्फोट आज करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आयकर विभागाला मिळालेल्या छापेमारीत एक डायरी आढळली होती. मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचं म्हटलं होते. यातील मातोश्रीच्या उल्लेखामुळे विरोधकांनी टीका करत याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजे आपली आई असल्याचे स्पष्टीकरण् दिले होते. आता यशवंत जाधव यांच्याच यादीत अजून दोन नवीन नावांचा उल्लेख आढळून आला आहे.

आता त्यात केबलमॅन १ कोटी २५ लाख रुपये तर एम ताईला ५० लाख रुपये दिल्याचा उल्लेख डायरीत केलेला आहे. त्यामुळे ती दोन नाव कोण? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. यातील केबलमॅन हा राज्यातील मोठा नेता असून एम ताई ही व्यक्ती महापालिकेशी संबंधीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता ही दोन नावे कोणती याचा तपास आयकर खात्याने सुरू केला आहे. परिणामी या नावांचा खुलासा झाल्यानंतर त्यांना देखील चौकशीला पाचारण करण्यात येईल अशी शक्यता आहे.

 

Protected Content