मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना स्लॅब आणि भिंत एकाचवेळी कोसळल्याने दोघा जणांचा दबून मृत्यू झाला आहे; तर एक जण गंभीर जखमी आहे. भाईंदर पूर्वेतील नवघर येथील ही घटना असून याप्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखल आहे. भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्यासमोर ‘श्रीनाथ ज्योती’ इमारतीच्या तळमजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू होते. घर मालकाने शेजारी असलेले घर विकत घेऊन दोन्ही घरे एकमेकांना जोडायचे काम सुरू केले होते.
कामादरम्यान न्हाणीघराची भिंत व त्यावर असलेला स्लॅब अचानक कोसळल्याने कंत्राटदारासह तिघेजण दबले गेले. घटनेबाबत तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आले होते. यावेळी कोसळलेली भिंत व स्लॅब उचलणे अशक्य असल्याने अग्निशमन दलाला अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यासाठी गॅस कटरच्या साह्याने भिंत तोडावी लागली. मात्र, तोपर्यंत हरिराम चौहान याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता, तर मखनलाल यादव याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या आकाश यादववर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.