नवी दिल्ली । राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने इस्लामीक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंध असणार्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने तामिळनाडू आणि कर्नाटकातून दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर इस्लामिक स्टेटसाठी भरती केल्याचा आणि भरती केलेल्यांना सीरिया पर्यंत पोहोचवण्यासाठी पैशाची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. अहमद अब्दुल कादीर (४०) आणि इरफान नासीर (३३) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अहमद अब्दुल कादीर तामिळनाडूचा तर इरफान नासीर बंगळुरु येथील रहिवासी असून त्यांना अटक केल्यानंतर कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
इस्लामिक स्टेटशी संबंधित तपास सुरु असताना, त्यांची नावे समोर आल्यानंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. अहमद अब्दुल कादीर बँकेत बिझनेस अॅनलिस्ट आहे तर नासीर व्यावसायीक आहे. त्यांना अटक केल्यानंतर इस्लामीक स्टेटशी संबंधीत अन्य दहशतवाद्यांचा माग काढणे सोपे जाणार असल्याचे मानले जात आहे.
याआधीत काश्मीरची रहिवाशी असलेल्या हिना बाशिर बेग (३९) आणि तिच्या नवर्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या संशयावरुन दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर एनआयएने त्यांची कस्टडी मिळवली होती. त्यांच्या चौकशीतून या दोघांची नावे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.