जळगाव (प्रतिनिधी) शहरातील समता नगर परिसरातील नागेश्वर कॉलनीत शुल्लक कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. हाणामारीसह घरावर दगडफेक झाल्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात रामानंद पोलीस स्थानकात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धुलीवंदन असल्याने समता नगरातील राजेश रमेश सुर्यवंशी हा मित्र विकास राजेंद्र बाविस्कर हे दोघं दुपारच्या सुमारास पंकज उर्फ बबलू मोहन गवई यांच्या कुलर्स रिपेअरींगच्या दुकानात ठेवलेल्या गवतावर बॅनर टाकून दारु पित होते. यावेळी दुकानात दारु पित असल्याचे पाहुन पंकज याने दोघांना शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी दिड वाजेच्या सुमारास कैलास बळीराम सोनवणे, अरुण बळीराम सोनवणे, गोकुळ बळीराम सोनवणे, आकाश प्रदिप नाईक, सचिन नाना गायकवाड, ऋषभ संजू सोनवणे व पंकज मोहन गवई (सर्व रा. समतानगर) यांनी शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी देत राजेश यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना मारहाण करीत त्यांच्या घरावर दगडफेक केली. यामध्ये घराच्या दरवाजा व खिडकांच्या मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी राजेश रमेश सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून दिलेल्या फियादीनुसार गोकुळ बळीराम सोनवणे हे दुपारी झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राजेश रमेश सुर्यवंशी यांच्याकडे गेले होते. जाब विचारल्याचा राग आल्याने राजेश रमेश सुर्यवंशी यांच्यासह प्रशांत रमेश सुर्यवंशी, बाळा राजेंद्र बाविस्कर, विकास राजेंद्र बाविस्कर (सर्व रा. नागेश्वर कॉलनी समतानगर) यांनी गोकुळ सोनवणे यांना लोखंडी रॉड व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.