यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । यवतमाळ जिल्हयात आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथील चौधरी कुटुंबातील महिला १३ एप्रिल रोजी सायंकाळी पैनगंगा नदीपात्रात बेलफूल वाहण्यासाठी गेले होते. यावेळी पाय घसरून दोन मुलींसह काकूचा पैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय-३५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या काकूचा तर अक्षरा नीलेश चौधरी (वय-११) व आराध्या नीलेश चौधरी (वय-९) असे मृत पुतण्यांचे नावे आहेत. आईच्या समोरच मुली बुडाल्या परंतु, आई काहीच करू शकली नाही.
पैनगंगा नदी पात्रात बेलफूल वाहण्यासाठी प्रतीक्षा प्रवीण चौधरी, जया नीलेश चौधरी, रेणू नीलेश चौधरी, अक्षरा नीलेश चौधरी, आराध्या नीलेश चौधरी असे चौधरी कुटुंबीय गेले होते. परंतु, पैनगंगा नदी पात्रात वाळू उपसा केल्याने मोठाले खड्डेच खड्डे पडले आहे. नदीला भरपूर पाणी असल्याने व वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात पाणी साचून असल्याने नदीपात्राच्या काठावर खड्डा आहे, हे लक्षातच आले नाही. त्यामुळे पाय घसरल्याने या खड्ड्यात काकू प्रतीक्षा, पुतण्या अक्षरा, आराध्या ह्या पडल्याने आई जया नीलेश चौधरी व मोठी बहीण रेणू नीलेश चौधरी ह्या तिघींना पाण्यातून बुडताना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रयत्न अयशस्वी झाला आणि ह्या तिघी बुडाल्या.
आई जया व बहीण रेणू यांनी यावेळी एकच आक्रोश केला. ही माहिती गावात पसरताच नातेवाइकांसह ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. तिघींनाही पाण्यातून काढण्यात आले, परंतु, त्यांचे मृतदेहच हाती लागले. ठाणेदार केशव ठाकरे पोलिस उपनिरिक्षक स्वाती वानखडे, जमादार सतीश चौधार, अशोक टेकाळे, नफीस शेख, विशाल गावंडे आदी घटनास्थळी दाखल झाले.