देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा : मान्यवरांची लतादिदींना आदरांजली

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |  गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून मान्यवरांसह सर्वसामान्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

 

लता मंगेशकर यांनी आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. यानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून या कालावधीत सर्व शासकीय कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे लतादिदींच्या निधनामुळे देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह समाजाच्या विविध स्तरांमधील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

 

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

लता मंगेशकर यांचं पार्थिव १२.१५ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी नेण्यासाठी बाहेर नेण्यात येईल. १२.३० ते ३ पर्यंत  त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. यानंतर त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Protected Content