जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रिकेट सामन्यांच्या यशस्वी आयोजनामध्ये पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव येथील जैन हिल्समधील सुबीर बोस हॉल येथे क्रिकेट पंचांची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून ही कार्यशाळा आयोजित होत असून, राज्यातील निवडक पंचांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.
या कार्यशाळेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मान्यताप्राप्त अनुभवी पंच संदीप चव्हाण, संदीप गांगुर्डे आणि मंगेश नार्वेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. क्रिकेट हंगाम सुरु होण्याआधी राज्यातील पॅनेलवर असलेल्या आणि परिक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचांसाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शक कार्यशाळांचे आयोजन दरवर्षी केले जाते. यामध्ये पंचांनी सामना चालविताना पाळावयाचे नियम, निर्णय क्षमतेचा विकास, ऑन-फिल्ड कम्युनिकेशन, तसेच नवीन नियमांतील बदल यांवर सखोल चर्चा केली जाते.

कार्यशाळेमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, केस स्टडीज, आणि थेट उदाहरणांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार असून, पंच म्हणून मैदानावरची जबाबदारी, दबावात निर्णय घेण्याची क्षमता, तसेच प्रोटोकॉलचे पालन यावर भर दिला जाणार आहे. यावर्षी या कार्यशाळेत राज्यातील एकूण ५७ पंच सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातून वरुण देशपांडे आणि मुश्ताक अली या दोन पंचांची निवड झाली आहे.
या उपक्रमाविषयी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन आणि सचिव अरविंद देशपांडे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अशा प्रशिक्षण कार्यशाळांमुळे पंचांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक प्रगल्भ पद्धतीने सामने हाताळू शकतात. जळगाव जिल्ह्यातून प्रतिनिधित्व होणे ही गौरवाची बाब असून, भविष्यात राष्ट्रीय स्तरावर पंच देण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.



