यावल महाविद्यालयात नॅक कमिटीचा दोन दिवसीय भेट दौरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल  येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे नॅक पुनर्मूल्यांकन संस्थेचे मानद सचिव भाऊसाहेब निलेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता महाविद्यालयात नॅक कमिटीचे आगमन झाले. यात डॉ. पी.के. विजयन (कन्नूर विद्यापीठ, केरळ) प्रा. राधेश्याम रॉय (बनारस हिंदू विद्यापीठ, उत्तर प्रदेश) व प्राचार्य राज किशोर भंडारी (बी.डी. इन्स्टिट्यूट ऑफ,दिल्ली) प्रमुख अतिथींचे प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

सकाळच्या पहिल्या सत्रात प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी महाविद्यालयीन कामकाजा बद्दलचे सादरीकरण करून सविस्तर आढावा मांडला. समितीने संस्थेचे व्यवस्थापन मंडळ प्रतिनिधी दादासाहेब वीरेंद्रजी भोईटे यांच्याशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे संचालक विजय एकनाथ पाटील, शासकीय प्रतिनिधी सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव येथील डॉ. संजय ठाकरे तसेच विद्यापीठ प्रतिनिधी व परिस्पर्श समिती सदस्य डॉ. उदय जगताप यांच्याशीही नॅक समितीने संवाद साधला. यावेळी आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ. हेमंत भंगाळे, नॅक समितीचे समन्वयक डॉ. एस. पी. कापडे तसेच स्टेरिंग कमिटीचे सर्व सदस्य यांचे अथक परिश्रमामुळे महाविद्यालयाचे नॅक पुनर्मूल्यांकन होत आहे.

यात इंग्रजी, रसायनशास्त्र, हिंदी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र,संगणक शास्त्र, वाणिज्य आदी विषयांचे संबंधित प्राध्यापकांनी संगणीकृत पी.पी.टी. स्लाईडवर सादरीकरण केले. आय. क्यू. एस. सी. कार्यालय, भाषा प्रयोगशाळा, संगणक खोली, शिक्षक दालन, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, ग्राहक भांडार, मुलींची बैठक रूम, परीक्षा पद्धत, आदिवासी म्युझियम, पटांगण, बॉटनिकल गार्डन इत्यादींची काटेकोर पाहणी करून परीक्षण केले. दुपारच्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभागाची तपासणी करण्यात आली.सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात आदिवासी नृत्य, लोक नृत्य, महाराष्ट्र गीत, भरतनाट्यम व केमिकल शेती जनजागृतीपर सादरीकरण करून कार्यक्रमाला रंगत आणली.

दुसऱ्या दिवसाच्या परीक्षण भेटीत समितीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी हितगुज साधला तसेच उर्वरित कामकाज पाहिले.
दोन दिवसीय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी चेअरमन डॉ. पी. के. विजयन यांनी महाविद्यालयातील कामकाजाबद्दल व विद्यार्थ्यांच्या गुणसंपन्न व्यक्तिमत्व बघून समाधान व्यक्त केले. प्रा. राधेश्याम रॉय यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी हे गुणसंपन्न व कर्तव्यदक्ष असून आदिवासी भागामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. यात महाविद्यालयाचे यश दडलेले आहे असे सांगितले. प्राचार्य डॉ.राजकिशोर भंडारी यांनी महाविद्यालयातील शिक्षणव्यवस्थेत कर्तव्यदक्ष कर्मचारीवर्ग व प्राध्यापकवृंदांचे महत्त्वाचे योगदान आहे. असे सांगितले

कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले की यावल महाविद्यालय हे आदिवासी बहुल भागात वसले असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणसंपन्न व्यक्तिमत्व विकासासाठी व भविष्यातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले असे प्रतिपादन केले. या प्रक्रियेत संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, नूतन मराठा, जळगाव, येथील प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख व सहकारी, वरणगाव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व्ही. एस. पवार व सहकारी, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एफ. एन. महाजन, सर्व सेवानिवृत्त प्राध्यापक व कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालकांचे आदींचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. रफाक अंजुम शेख यांनी केले, तर आभार आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. हेमंत भंगाळे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. संजय पाटील, डॉ.सुधीर कापडे, प्रा. एस आर गायकवाड, डॉ. एस. के. बच्छाव, डॉ. ए. एम. कलवले, श्री अनिल इंगळे, श्री किरण देशमुख, डॉ. हेमंत येवले, प्रा. मुकेश येवले, श्री. सुधीर निकम, श्री पंढरीनाथ तायडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

Protected Content