वृध्दाची फसवणूक करून चोरी करणाऱ्या दोन भुरट्या चोरांना अटक

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील बसस्थानक रोडवर ८८ वर्षीय वृध्दाजवळील ५४ हजारांची रोकड आणि ओळखपत्र चोरून नेल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना जळगावातील पिंप्राळा हुडको आणि मॉस्टर कॉलनी परिसरातून शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ईस्माईल शेख शब्बीर (वय-४८) रा. मास्टर कॉलनी, आणि सैय्यद आरीफ सैय्यद सईद (वय-३९) रा. पिंप्राळा हुडको जळगाव असे अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.

 

याबाबत अधिक असे की, जामनेर तालुक्यातील लाहसर येथे राहणारे राजाराम तुळशीराम पाटील (वय-८८) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी ते कामाच्या निमित्ताने जामनेर शहरात आले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशन ते जामनेर बसस्थानक दरम्यान रिक्षातून प्रवास करत असतांना रिक्षातील काही चोरट्यांनी त्यांच्याजवळील ५४ हजारांची रोकड चोरून नेली होती याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुरनं ४९२/२०२३ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली असून दोन संशयित आरोपी हे जळगावातील असलेल्याचे समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता सापळा रचून ईस्माईल शेख शब्बीर याला मास्टर कॉलनीतून तर  सैय्यद आरीफ सैय्यद सईद याला पिंप्राळा हुडको परिसरातून अटक केली. दोघांनी चोरी केल्या कबुली दिली. पुढील कारवाईसाठी दोघांना जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ अकरम शेख, पोहेकॉ सुधाकर आंभोरे, महेश महाजन, किरण चौधरी, पो.ना. विजय पाटील, पो.कॉ. सचिन महाजन यांनी ही कारवाई केली आहे.

Protected Content