दोन चाळीसगावकरांमध्ये रंगणार लोकसभेच्या कुस्तीचा आखाडा !

चाळीसगाव दिलीप घोरपडे । अनपेक्षित राजकीय घडामोडी झाल्यानंतर आमदार उन्मेषदादा पाटील यांना भाजपचे तिकिट मिळाल्याने आता लोकसभेच्या रिंगणात मूळचे चाळीसगावकर असणार्‍या दोन मातब्बरांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चाळीसगाव तालुका तसा कुस्ती आणि पैलवानांसाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्याने महाराष्ट्राला ट्रीपल महाराष्ट्र केसरी पैलवान देखील दिला आहे. जवळपास वीस वर्षांपूर्वी चाळीसगाव तालुक्यात राजकीय पक्षांऐवजी तालमीच्या नावाने गट होते. आज जसे कुणी शिवसेनेचा कुणी भाजपचा कुणी राष्ट्रवादीचा असे कार्यकर्ते ओळखले जातात तसे पूर्वी तालमीच्या नावावरून गट आणि पैलवान ओळखले जायचे. म्हणून कुस्तीचे डावपेच चाळीसगाव तालुकावासियांना चांगल्याप्रकारे माहीत असल्याने राजकीय डावपेचातही चाळीसगावकर मागे नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर हे जळगाव येथे राहत असले तरी ते मूळचे चाळीसगाव तालुक्यातील पळासरे येथील रहिवाशी आहेत. त्यांचे बालपण हे पळासरे, मेहुणबारे, चाळीसगाव येथे गेले आहे. तर भाजपाने ऐनवेळी धक्कातंत्र देऊन घोषित झालेले उमेदवार स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलून चाळीसगावचे आमदार उन्मेशदादा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आता लोकसभेची लढत दोन्ही चाळीसगावकरांमध्ये होणार असल्याने या कुस्तीमध्ये दोन्ही चाळीसगाव करांचे कसब पणाला लागणार आहे.

आमदार उन्मेश पाटील नव्या दमाचे तरुण रक्ताचे उमेदवार असल्याने त्यांची ताकद कुस्तीमध्ये नक्कीच उजवी ठरू शकते. मात्र गुलाबराव देवकर वयाने मोठे असले तरी ताकदी ऐवजी अनुभवाचे डावपेच कशाप्रकारे वापरतात यावरही या पॉलिटीकल कुस्तीचे बरेच भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच आता जळगाव लोकसभा मतदार संघाची कुस्ती चाळीसगावकर पैलवानांच्या आखाड्यातील डावपेचांवर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. अर्थात, चाळीसगाव हा कुस्तीप्रेमी लोकांचा तालुका असल्याने आपल्या तालुक्यातील दोन्ही पैलवानांची रंगणारी कुस्ती मोठ्या आवडीने चाळीसगावकर पाहतील यात शंका नाही.

One Response

  1. हेमंत भोईटे

Add Comment

Protected Content