जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील देऊळवाडे शिवारात झुडुपात लपून बसलेल्या बिबट्याने तिघांवर हल्ला करून जखमी केले होते. या बिबट्याला पकडण्यासाठी आज वनविभागाने परिसरात दोन पिंजरे लावले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान,देऊळवाडे, सुजदे, भोलाणे या परिसरात पहिल्यांदाच बिबट्या आढळुन आला आहे. त्यामुळे शेतकरी देखील भयभीत झालेले आहेत.
या संदर्भात अधिक असे की, मंगळवारी सकाळी १० वाजता देऊळवाडे गावाजवळील झुडुपात लपून बसलेल्या बिबट्याने शेतात कडबा कापत असलेल्या प्रमोद संजय सोनवणे (वय २०, रा.देऊळवाडे), देवचंद लक्ष्मण सोनवणे (वय ५७, रा.देऊळवाडे) या दोन शेतकऱ्यांसह वनपाल गोपाल रामदास बडगुजर (वय ५०, रा.जळगाव) यांच्यावर हल्ला चढवला होता. या तीघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. या प्रकारामुळे संपर्ण परिसरात खळबळ माजत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भिती परसली होती. दरम्यान, मंगळवारी सायंकाळनंतर बिबट्या दिसून आला नाही. तसेच रात्रीतून कोणावरही हल्ला झाल्याची घटना समोर आली नाही. त्यामुळे बिबट्याने जंगलाच्या दिशेने पलायन केल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. तसेच सुमारे ३ ते ४ वर्षे वय असलेला हा बिबट्या असल्याचे देखील वनविभागाने म्हटले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची बिबट्याचे पगमार्क घेतले आहेत. या बिबट्याने पुन्हा नागरीकांवर हल्ला करु नये, म्हणून वन विभागाकडून दक्षता घेतली गेली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात दोन पिंजरे लावण्यात आलेले आहेत. तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त देखील सुरू आहे.