जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद ते तरसोद फाट्यादरम्यान हॉटेल सावनसमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दुचाकी वरील न्यायालयीन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर इतर दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी १ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. बोदवड न्यायालयातील वरिष्ठ लिपिक योगेश बळीराम पाटील (वय ५१, रा. चैतन्य नगर, जळगाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बोदवड न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले योगेश पाटील हे दररोज जळगाव ते बोदवड असा प्रवास करत असत. मंगळवारी 1 मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास बोदवडहून जळगावला परतत असताना, नशिराबाद ते तरसोद फाट्यादरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाटील रस्त्यावर फेकले गेले, त्यात ते गंभीर जखमी झाले तर समोरील दुचाकी वरील भुसावळ येथील मुस्तफा लतिफ खान (वय ६५) आणि बी.डी. फर्नांडिस (वय ६१) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान योगेश पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
योगेश पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी लघु पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे न्यायालयीन वर्तुळासह जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.