जळगावात गावठी पिस्तूलासह दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरात गावठी पिस्तुल घेवून दहशत माजविणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री अटक केली. दोघांकडुन पिस्तुलासह जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहेत. दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार, शहरातील समता नगरातील कार्तिक राजू सुरवाडे (वय-१९) हा तरुण मानराज पार्कजवळ गावठी पिस्तुल कंबरेला खोचून दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ भगवान पाटील, प्रदिप पाटील, जयंत चौधरी, दादाभाऊ पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन पाटील यांचे पथक तयार केले. या पथकाने  दुपारी रविवारी  ४ वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, कार्तिकच्या हालचाली त्यांना संशयास्पद दिसून आल्या. त्यांनी कार्तिकची विचारपूस करीत अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला ३० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी पिस्तुल जमा करीत कार्तिकला अटक केली.

पिस्तुलसह कार्तिक सुरवाडे याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली. यात त्याने पिस्तुलची काडतुसे हे त्याचा मित्र राहुल घेवरचंद बनबेरु (वय-३०,रा. रायसोनी नगर) याच्याकडे असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी राहुलचा शोध घेतला असता राहुल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याला देखील अटक केली असून दोघांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content