जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या दोन आरोपींमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर एका आरोपीने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यात आकाश ऊर्फ टपऱ्या युवराज कोळी या तरुणाच्या छातीत गोळी लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलीसांनी हद्दपार आरोपीसह इतर दोन जण असे तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातून हद्दपार केलेला आरोपी आकाश ऊर्फ डोया मुरलीधर सपकाळे हा विनापरवानगी कांचननगर भागात आला होता. याच परिसरात हद्दपार असलेला दुसरा आरोपी गणेश ऊर्फ काल्या रवींद्र सोनवणे देखील उपस्थित होता. या दोघांमध्ये ९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता किरकोळ कारणावरून वाद झाला होता.

या वादातून आकाश सपकाळे याने विकी अरुण चौधरी आणि करण चंद्रशेखर पाटील यांच्यासोबत संगनमत करून गणेश सोनवणे याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. पहिली गोळी सोनवणे याच्या डाव्या हाताला लागून तो जखमी झाला. मात्र, दुसऱ्यांदा फायर केल्यावर ती गोळी तरुण आकाश ऊर्फ टपऱ्या कोळी याच्या छातीत लागली. गंभीर जखमी झालेल्या कोळी याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गोळीबार करणारे आरोपी पसार झाले होते.
पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकांनी मुख्य आरोपी आकाश ऊर्फ डोया सपकाळे, विकी अरुण चौधरी, आणि करण चंद्रशेखर पाटील या तिघांनाही अटक केली आहे. विकी चौधरी सध्या पोलीस कोठडीत असून, अन्य दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शनिपेठ पोलीस निरीक्षक कावेर कमलाकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.



