जयपूर-लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । राष्ट्रीय राजपूत करणी सेना अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्याकांड प्रकरणात गोळीबार करणाऱ्या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. नितिन फौजी आणि रोहित सिंह राठोड अशी त्यांची नावे आहेत.
यपूरच्या श्याम नगर पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी (५ डिसेंबर ) दुपारी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यासह दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हल्लेखोरांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सुखदेव सिंह यांनी गोगामेडी यांना मानसरोवर येथील खासगी रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यावेळी नवीन सिंह नावाच्या तरुणाचाही गोळी लागल्यानं मृत्यू झाला. त्याचवेळी सुखदेव सिंह गोगामेडी यांचे खासगी सुरक्षा कर्मचारी अजित सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि इतर ठिकाणी शोध घेत होती. छापे टाकले जात होते. राजस्थान पोलीस इतर राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधून आरोपींचा शोध घेत होते. त्याचवेळी एनआयए, मिलिटरी इंटेलिजन्स आणि दिल्ली क्राइम ब्रँचचे पथकही आरोपींचा शोध घेत होते. दोन्ही आरोपींवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलं होतं.
याआधी पोलिसांनी दोन्ही शूटर्सना सहकार्य करणाऱ्या आरोपी रामवीर जाट (रा.महेंद्रगड, हरियाणा) याला अटक केली होती. रामवीर हा नितीन फौजीचा खास मित्र आहे. रामवीरने जयपूरमध्ये दोन्ही शूटर्सला साथ दिली होती.