अमळनेरात मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक : तब्बल १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
130


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरांना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २४ मोटारसायकली, सुमारे १५ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईने अमळनेर परिसरात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अनिता भरकर, चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोसो यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, गणेश पाटील, उत्कम कुमार म्हसके, नितीन ननोरे, चाल पाटील आणि हितेश बेहरे यांनी अत्यंत काटेकोरपणे तपास करून ही कारवाई यशस्वी केली.

अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३०८/२०२५, २९९/२०२५ आणि २३३/२०२५ या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणांचा तपास सुरु असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासात आरोपी हिर्भत हिल्या पाकट व अंबालाल भुरट्या खरडे (दोघे रा. शहादा, जि. नंदुरबार) यांच्याकडे संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत दोघांनी अमळनेर तसेच इतर परिसरातील मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार आरोपींना घेऊन सातारा-शहादा परिसरातील जंगल भागात शोध मोहिम हाती घेतली. त्यातून २४ मोटारसायकली विविध ठिकाणांहून जप्त करण्यात आल्या. या वाहनांमध्ये होंडा युनिकॉर्न, होंडा शाईन, बजाज पल्सर, टीव्हीएस रायडर, हीरो स्प्लेंडर अशा विविध कंपन्यांच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. या सर्व वाहनांची एकत्रित किंमत सुमारे १५ लाख ६३ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जप्त केलेल्या मोटारसायकलींपैकी बहुतेक काळ्या रंगाच्या असून, काही वाहनांवर बनावट क्रमांक प्लेट लावलेले आढळले. पोलिसांनी सर्व वाहनांचा पंचनामा करून ती अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आणली आहेत. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईचा पुढील तपास पोहेकाँ काशिनाथ पाटील आणि पोकॉं ५२२ सागर साळुंखे हे करत आहेत. अमळनेर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. पोलिसांच्या दक्षतेमुळे चोरीच्या घटनांवर आळा बसला असून चोरीस गेलेल्या वाहनांचे मालक आनंदित झाले आहेत.

अमळनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.