जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेच्या घरातील रोकडसह सोन्याची मंगलपोत व दागिने असा अडीच लाखाचा मुद्देमाल जबरी चोरून नेणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी ताब्यात घेतले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रचना कॉलनी येथे राहणाऱ्या आशाबाई गोपाल चौधरी (वय-४२) रा. रचना कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ मार्च रोजी पाहटे ३ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून सुनील रसाळ राठोड, संजय रसाळ राठोड रा. कासमवाडी, विशाल पदमसिंग परदेशी रा. कुसुंबा आणि रुपेश संजय सपकाळे रा. कांचन नगर यांनी महिलेच्या घरात घुसून मारहाण केली व घरातील सामानांची तोडफोड केली. तसेच महिलेच्या घरात ठेवलेले १ लाख रूपयांची रोकड आणि सोन्याची मंगलपोतसह सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुनील राठोड, संजय राठोड दोन्ही रा. कासमवाडी, विशाल पदमसिंग परदेशी रा. कुसुंबा, रुपेश संजय सपकाळे रा. कांचन नगर, गणेश भास्कर सोनार, अविनाश रामेश्वर राठोड, रा.रेणुका नगर मेहरूण जळगाव आणि ललीत उमाकांत पाटील रा. इश्वर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यता आला होता.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुनिल राठोड, संजय राठोड, विशाल परदेशी, रूपेश सपकाळे आणि गणेश सोनार यांना यापुर्वीच अटक केली होती. तर फरार असलेले संशयित आरोपी अविनाश रामेश्वर राठोड, रा.रेणुका नगर मेहरूण जळगाव आणि ललीत उमाकांत पाटील रा. इश्वर कॉलनी, जळगाव यांना सोमवार २८ मार्च रोजी जैनाबाद परिसरातून अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या माहितीवरून सपोन प्रमोद कटोरे, सफौ अतुल वंजारी, किरण पाटील, प्रदीप पाटील, मुकेश पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी केली. दोन्ही संशयितांना मंगळवारी २९ मार्च रोजी न्यायमूर्ती शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.