जळगाव प्रतिनिधी । जबरीलुटीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी रेल्वेने पळून जात असतांना शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी त्यांना रेल्वे स्टेशनपरिसरात सापळा रचुन अटक केली. भूषण भरत सोनवणे ( २१) रा. सिद्धिविनायक पार्क व संदीप मधुकर निकम (२२) रा. गेंदालाल मिल असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील त्रिभुवन कॉलनतील पवन बबन आढाळे हा युवक २२ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्याच्या आईसाठी औषधी घेण्यासाठी मेडीकलवर गेला होता. औषधी घेतल्यानंतर पवन व त्याचा मित्र मनोज हे दोघ दुचाकीवरून घराकडे येत होते. यावेळी इंद्रप्रस्थ नगरच्या रिक्षा स्टॉपजवळ संशयित आरोपी भूषण सोनवणे, संदीप निकम च त्यांच्या एका साथीदार यांनी पवनची दुचाकी अडवित आम्हाला घरी सोड असे सांगितले. परंतु आईला औषधी द्यायची आहे असे सांगत पवनने त्याला घरी सोडण्यास नकार दिला.
घरी न सोडण्याचा राग आल्याने केली मारहाण
घरी न सोडण्याचा राग आल्याने भूषण व त्याच्या साथीदारांनी पवनच्या दुचाकीला लाथ मारीत त्याला खाली पाडले. त्यानंतर पवन व त्याचा मित्राला मारहाण करीत त्याच्या खिशातून ८०० रुपयांची बळजबरीने काढून घेतली. तसेच मारहाणीत पवनच्या मित्र मनोजच्या डोळ्याला लोखंडीपट्टीमूळे गंभीर दुखापत झाल्याने याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल झाला होता.
पळून जाण्याच्या तयारीत असतांना केली अटक
नवीन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम यांनी या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्याचे काम डिबीच्या कर्मचार्यांना दिले होते. त्यानुसार या गुन्ह्यातील आरोपी रेल्वेने पळून जाणार असल्याची माहिती पोलीस नाईक अक्रम शेख व सुधीर साळवे यांना मिळाली. त्यानुसार वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, बशीर तडवी, भास्कर ठाकरे, गणेश पाटील, गणेश शिरसाळे, रतन गीते यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून संशयित आरोपी भुषण सोनवणे व संदिप निकम या दोघांना अटक केली आहे.