जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणाबाजार येथे रिक्षात बसलेल्या तरूणीचा दोघांकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोर आला आहे. याप्रकरणी रात्री साडेआठ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २१ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनीवारी १९ ऑक्टोबर रोजी कामाच्या निमित्ताने तरूणी ही जळगावातील दाणबाजार परिसरात आलेली होती. त्यावेळी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी दाणाबाजार येथील एका रिक्षात बसली. त्यावेळी संशयित आरोपी समीर जुलफान मलीक आणि मोहम्मद जाहीद मोहम्मद राशीद दोन्ही रा. उत्तरप्रदेश ह.मु.सलार नगर, जळगाव हे देखील बसले. त्यांनी महिलेच्या अंगाला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने थेट जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री साडेआठ वाजता संशयित आरोपी समीर जुलफान मलीक आणि मोहम्मद जाहीद मोहम्मद राशीद दोन्ही रा. उत्तरप्रदेश ह.मु.सलार नगर, जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे हे करीत आहे.