गांजा तस्करी करणार्‍या दोघांना अटक

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरिक्षक संजय ठेंगे यांना मध्यप्रदेशातून एका कारमधून शस्त्रे आणि अवैध दारू याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. यात रांजणगाव फाट्याजवळ धुळ्याकडून औरंगाबाद येथे जाणार्‍या हुंदाई इऑन कंपनीच्या एमपी-०९-सीएन ५६९५ क्रमांकाच्या गाडीला अडवून याची तपासणी करण्यात आली.

या कारमध्ये ८ किलो ४०० ग्रॅम वजनाइतका गांजा आढळून आला. यामुळे पोलिसांनी भिका उर्फ सिंगम इजम शिसोदिया (वय १९, रा. इंद्रपूर, जि. बडवानी, मध्यप्रदेश) आणि पप्पू अंगाशिया जमरे ( वय २५, रा तलाव फलीया जिल्हा बडवानी, मध्यप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली. हा गांजा १,२६,००० रूपयांचा असून कारसह इतर एकूण ४ लाख ८८ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर अधिक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, उपनिरिक्षक संपत आहेर, हवालदार युवराज नाईक, नंदलाल परदेशी, नितीश पाटील, नितीन आमोदकर, शांताराम पवार, भूपेश वंजारी, गोकुळ सोनवणे, प्रेमसिंग राठोड, बिभीषण सांगळे व हेमंत दुसाने यांच्या पथकाने केली.

Protected Content