कालिंका माता मंदीर परिसरातील खून प्रकरणातील फरार दोन संशयितांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील कालिंका माता मंदीर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे याचा तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना २३ मे रोजी घडली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना रविवारी २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पाठलाग करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते मालवण पोलीसांनी अटक केली आहे. निलेश युवराज सपकाळे (वय ३५, रा. शनिपेठ, जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (वय ३०, रा. श्रीराम नगर, जळगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे २३ मे २०२४ रोजी किशोर सोनवणे या तरूणाचा जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती. ही संपुर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील दोन संशयित आरोपी निलेश युवराज सपकाळे आणि अमोल छगन सोनवणे हे फरार होते. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना या खून प्रकरणातील संशयित आरोपी निलेश सपकाळे आणि अमोल सोनवणे हे दोघो सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यांमध्ये आजगाव येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाली.

जळगाव पोलीसांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलीसांनी आजगाव येथे जावून जाऊन संशयित आरोपींची माहिती घेतली. पोलीसांचा सुगावा लागल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी हे मालवणच्या दिशेने पसार होत असतांना पोलीसांनी दोघांचा पाठलाग करून अटक केली. सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली व दोघांना जळगाव एलसीबीच्या ताब्यात देण्यात आले असून पथक जळगावला येण्यासाठी निघाले आहे.

Protected Content