कंगनाच्या आरोपांना तुषार गांधींचे उत्तर

मुंबई प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत हिने महात्मा गांधी यांच्यावर सुरू केलेल्या टिकेला आज बापूंचे पणतू तुषार गांधी यांनी उत्तर दिले आहे.

 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही असा दावा   केला आहे. कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका बातमीचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये महात्मा गांधी आणि इतर सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटीशांकडे सोपवण्यास तयार झाले होते असा उल्लेख आहे. कंगनाने यावेळी महात्मा गांधींनी दिलेल्या अहिसेंच्या शिकवणीचीही खिल्ली उडवली होती.  स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती असं म्हणत कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना तिने म्हटलं आहे की, हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा.

 

कंगनाच्या या टीकेला तुषार गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. दुसरा गाल पुढे करण्यासाठी गांधींचा द्वेष करणारे समजू शकतील त्यापेक्षा जास्त हिंमत लागते असं या लेखाचं शीर्षक आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात असा आरोप करणारे भित्रट असून यासाठी लागणारं धाडस ते समजू शकत नाहीत. हे धैर्य समजून घेण्यास ते असमर्थ आहेत. पण आपण विसरता कामा नये. दुसरा गाल पुढे करणं हे भीतीचं लक्षण नाही. यासाठी खूप धाडस लागतं आणि हे त्यावेळीच्या भारतीयांनी मोठ्या प्रमाणात दाखवून दिलं होतं. ते सर्वजण हिरो होते, तर भित्रट लोक आपल्या डोळ्यांची पापणीही न हालवता वैयक्तिक फायद्यासाठी दयेसाठी याचना करत होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Protected Content