तुतारी घुमणार : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमधील वादामुळे फटका बसलेल्या शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाच्या आजच्या निकालाने मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षीच्या मध्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार आणि सहकारी राज्यातील सत्तेत सहभागी झाले. तर शरद पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांची बाजू कमकुवत बनली. यातच निवडणूक आयोगाने मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्या गटाकडे राहील असा निर्णय दिला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार या नावाने नवीन पक्ष हा शरद पवार गटाला देण्यात आला. त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हा देण्यात आले. याच चिन्हावर या गटाने लोकसभा निवडणूक लढवत दहापैकी आठ जागांवर विजय संपादन केला.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक ठिकाणी तुतारीच्या जोडीला अन्य उमेदवारांना ट्रंपेट हे चिन्ह देऊन त्याचा उल्लेख तुतारी असा करण्यात आला. यामुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विधानसभा निवडणुकीत हा प्रकार घडू नये म्हणून शरद पवार गटाने निवडणूक आयोगात तक्रार केली होती. यावर आज निकाल देण्यात आला.

या निकालात शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले असून याचाच तुतारी उल्लेख करण्यात येणार आहे. तर पिपाणी हे चिन्ह असल्यास त्याला ट्रंपेट असे संबोधण्यात येईल असे देखील निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Protected Content