चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील हिंगोणे गावाजवळ निदर्यपणे बांधून २१ गुरांची वाहतूक करतांना अपघात होवून आयशर ट्रक पलटी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली आहे. या घटनेनंतर आयशर ट्रक चालक व क्लिनर हे दोघे गुरांनी भरलेले वाहन सोडून पसार झाला. याप्रकरणी दुपारी ४ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे गावाजवळून आयशर ट्रक क्रमांक (आरजे २५ जीए ६९७१) मधून गुरांची निर्दयीपणे वाहतूक होत असतांना चालकाचा वाळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात होवून वाहन पलटी झाले. ही घटना गुरूवार ३० मे रोजी सकाळी ६ वाजता घडली. हा अपघात घडल्यानंतर ट्रक चालक अनवर खान समशेर खान आणि क्लिनअर फिरोज कुरेशी हसन कुरेशी दोन्ही रा. खंडवा राज्य मध्यप्रदेश हे वाहन सोडून पसार झाले. दरम्यान वाहनाचा अपघात घडल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी दाखल झाले असता वाहनामध्ये गुरांना निर्दयीपणे बांधून वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी बांधलेल्या २१ गुरांची सुटका करून आयशर वाहन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हिंगोणे गावाचे पोलीस पोलीस ज्ञानेश्वर मोहन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी ४ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय शिंदे हे करीत आहे.