भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले; दोन तरूण जागीच ठार

एरंडोल प्रतिनिधी । भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत जळू येथील दोन तरूण जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्री घडली. या अपघातात ट्रकचालक वाहन सोडून फरार झाला आहे. एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इंद्रसिंग दगडू पाटील वय-२७ वर्षे व भूषण कौतिक पाटील वय-२२ वर्षे रा. जळू ता. एरंडोल असे ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत. 

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेतात फवारणीसाठी लागणारे औषधी घेवून  इंद्रसिंग दगडू पाटील व भूषण कौतिक पाटील हे दोघे तरूण एरंडोलकडून (एमएच२० एफक्यू ७५०५) क्रमांकाच्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने जळू येथे घरी जात असताना शहा पेट्रोल पंप नजीक पारोळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९ झेड ४५२७) क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात इंद्रसिंग व भूषण हे दोघे युवक जागीच ठार झाले. दुर्घटना घडली असता ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला.

याबाबत नरेंद्रसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विलास पाटील,जुबेर खाटीक व विकास खैरनार हे करीत आहेत.

Protected Content