जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुली येथे सिग्नलवरुन दुचाकी काढतांना ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहेत. एमआयडीसी पोलिसात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख रोशन अब्दुल रज्जाक हे यांची मुलगी हिना आरीफ पिंजारी ही गरोदर असल्याने तिला जळगाव शहरातील ममता हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहेत. तिला पाहण्यासाठी शेख रोशन हे त्यांची पत्नी शमीम बी हिच्या सोबत १० ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक. एम.एच.१९ सी.एन.९२४ ने येत होते. जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे सिग्नलवर ते थांबले होते. सिग्नल सुरु झाल्यानंतर पुन्हा निघाले असता, त्यांना यावेळी एम.एच. १८ बी.यू. ५४९९ या ट्रकने शेख रोशन यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात शेख रोशन तसेच त्यांची पत्नी शमीम बी हे दुचाकीवरुन खाली पडले. त्यानंतरही ट्रक थांबला नाही, त्याने खाली पडलेल्या शेख रोशन यांना पाच ते आठ फुटापर्यंत फरफरट नेले. या अपघातात सुदैवाने शेख रोशन हे बचावले आहेत, त्याच्या डाव्या पायाचे हाड मोडले असून त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची शमीम बी यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी रात्री शेख रोशन यांच्या जबाबावरुन एमआयडीसी पोलिसात एम.एच.१८ बी.यू.५४९९ या क्रमांकाच्या ट्रकवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील हे करीत आहेत.