अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदनगरमधील पोलिस भरतीसाठी बाह्य वळण रस्त्यावरील अरणगाव ते वाळुंज दरम्यानची एक बाजू बंद केली आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहने ये-जा करत आहेत. परिणामी रस्त्याचा अंदाज न आल्याने शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कंटेनर, ट्रक समारोसमोर धडकले. त्याचवेळी पाठीमागून येणारी स्विफ्ट कार कंटेनरला धडकली. या अपघातात सुब्रमण्यम गोबल, प्रधान सुरजकरण जाट या ट्रक व कंटेनर चालकांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघात इतका भीषण होता की, अपघातामुळे अरणगाव ते वाळुंज मार्गावर दुपारी अडीचपर्यंत साडेसहा तास वाहतूक खोळंबली होती.
शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाळुंजकडून अरणगावकडे केमिकल गोण्यांनी भरलेला ट्रक (आरजे ०९ जीसी २८३९) येत होता. त्याचवेळी अरणगाव उड्डाणपुलावरून वाळुंजच्या दिशेने लोखंडी पोल घेऊन जाणारा कंटेनर (टीएन ५२ जे ५८५३) येत होता. याच्याच पाठिमागे स्विफ्ट कार (एमएच १४ जीएच १५१७) येत होती. उड्डाणपूल वरून वेगाने येणाऱ्या कंटेनरला पुढील एक रस्ता बंद असल्याने अचानकपणे दुसऱ्या रस्त्यावर जावे लागले. त्यामुळे कंटेनर आणि ट्रक समोरासमोर धडकले. कार कंटेनरला मागून धडकली.
भीषण अपघातात ट्रक व कंटेनरच्या केबिनचा अक्षरश: चुराडा झाला. दोन्ही वाहनांना वेगळे करण्यासाठी अडीच तासांपेक्षा अधिक वेळ लागला. मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. पोलिसही आले. तुटलेल्या केबिनमधून चालकाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी, क्रेनचा वापर करावा लागला. कारचेही मोठे नुकसान झाले. एका जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे.