Home क्राईम सोलापूर हादरवणारे तिहेरी हत्याकांड ; 25 लाखांचा वाद जीवघेणा 

सोलापूर हादरवणारे तिहेरी हत्याकांड ; 25 लाखांचा वाद जीवघेणा 


सोलापूर- वृत्तसेवा । सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. संपत्तीच्या वादातून दीरानेच आपल्या भावजयसह पुतण्या आणि पुतणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरामणी येथे हे तिहेरी हत्याकांड घडले असून, शंकर उर्फ पप्पू म्हस्के या आरोपीने भावजय गायत्री म्हस्के तसेच तिची दोन मुले शिवराज आणि प्रिया यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गायत्री म्हस्के यांचे पती सुधाकर म्हस्के यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबातील संपत्तीच्या वादावरून गेल्या काही महिन्यांपासून आरोपी आणि मृत महिला यांच्यात वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर आरोपी शंकर उर्फ पप्पू म्हस्के हा फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तीन विशेष पथके रवाना केली आहेत. या प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (अ), 351(2), 3, 5 तसेच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे मृत प्रिया म्हस्के हिने नुकतीच बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिली होती आणि तिला 68.83 टक्के गुण मिळाले होते. निकाल पाहण्यापूर्वीच तिची क्रूर हत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच शिवराज म्हस्के हाही यावर्षी दहावी सीबीएसई परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याला 61.82 टक्के गुण मिळाले होते. उज्ज्वल भविष्य असलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.

नातेवाईकांच्या माहितीनुसार, मृत गायत्री म्हस्के यांनी संपत्तीतील वाटा आणि आरोपीकडे दिलेले सुमारे 25 लाख रुपये परत मिळवण्यासाठी तगादा लावला होता. या आर्थिक आणि मालमत्तेच्या वादातूनच आरोपीने हे भीषण कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे कुटुंबातील वादाचे भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.


Protected Content

Play sound