जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तब्बल तीन वेळेस महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेते तथा सध्या महाराष्ट्र पोलिसात उच्च पदावर कार्यरत विजय चौधरी यांनी राजकारणात उतरण्याचे संकेत दिले असून ते जळगाव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे संकेत मिळाले आहेत.
मुळचे चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील रहिवासी विजय चौधरी यांनी तीनदा महाराष्ट्र केसरी हे पदक पटकावले आहे. तसेच त्यांनी कॅनडात झालेल्या आंतराष्ट्रीय पोलीस कुस्ती स्पर्धेत जागतिक विजेतेपद मिळविले आहे. सध्या ते पुणे येथे पोलीस उपायुक्त या पदावर कार्यरत आहेत. विजय चौधरी हे समाजकारणात सक्रीय असून सोशल मीडियातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आता ते राजकारणात उतरण्याचे संकेत असून या संदर्भात टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.
या वृत्तानुसार, विजय चौधरी हे लवकरच आपल्या शासकीय नोकरीला राजीनामा देऊन राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची असून आपला आवडीचा पक्ष हा भाजप असल्याचे त्यांनी टिव्ही नाईनशी बोलतांना सांगितले. यामुळे अर्थातच, ते जळगाव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक असल्याचे संकेत मिळाले आहेत.