जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे सत्तासूत्र ठरले : जाणून घ्या अचूक माहिती ( व्हिडीओ )

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या सत्ता वाटपाचे सूत्र आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरले असून यानंतरच्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद नेमके कोणत्या पक्षाला आणि किती काळासाठी मिळणार ? याची आम्ही आपल्याला देत आहोत अचूक माहिती !

जिल्हा बँकेची निवडणूक खूप मोठ्या प्रमाणात गाजली. यात बरेच दिवस सर्वपक्षीय पॅनलचे गुर्‍हाळ सुरू होते. मात्र शेवटच्या टप्प्यात भाजपला गाफील ठेवत महाविकास आघाडीने पॅनल बनविण्याची घोषणा केली. तर भाजपने सत्ताधारी आघाडी सत्तेचा गैरवापर करून दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला. यामुळे भाजपच्या मातब्बर नेत्यांनी ऐन वेळेस निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला ७, कॉंग्रेसला ३ तर भाजपला एक जागा मिळाली.

निकालानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या दावेदारांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी केली. यात राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मुंबईत आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यात एकनाथराव खडसे यांना अध्यक्ष निवडीचे अधिकार देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिली.

जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात आयोजीत करण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार शिरीष चौधरी, आामदार किशोरआप्पा पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संचालक प्रतापराव हरी पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सत्ता वाटपाच्या सूत्राची माहिती दिली. ते म्हणाले की, पहिले तीन वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपद मिळणार असून नंतरची दोन वर्षे शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार आहे. तर पहिले दोन वर्ष कॉंग्रेसला, नंतरची दोन वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार आहे. या अनुषंगाने उद्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.

तर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने एकत्रीत निवडणूक लढवून घवघवीत यश संपादन केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार हे एकनाथराव खडसे ठरविणार असून शिवसेनेच्या उपाध्यक्षपदाचे उमेदवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठरविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी जशी एकत्र होती, तशीच निवडणुकीनंतरही राहणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

खालील व्हिडीओजमध्ये पहा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिलेली माहिती !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/600162247989581

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1138922346844813

Protected Content